
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)। गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आंबेवाडी नाका परिसरातील गंभीर आणि जीवघेण्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ आंबेवाडी–कोलाड–वरसगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी तिसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. प्रशासनाच्या कानाडोळा धोरणाविरोधात आज व्यापाऱ्यांनी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
मुंबई–गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड वरसगाव येथील VUP उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना किमान २०० मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावेत, अद्याप अपूर्ण असलेले सर्विस रोडचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, गटारांवर झाकणे बसविण्यात यावीत, तसेच पेण, नागोठणे, लोणेरे व महाडप्रमाणे आंबेवाडी नाक्यावरही अंडरपासची सुविधा द्यावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या आहेत.
गेली तीन दिवस सुरू असलेल्या या साखळी उपोषणाकडे संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे.
या आंदोलनाला माजी सरपंच सुरेशदादा महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, चंद्रकांत जाधव, संजय कुर्ले, महेंद्र वाचकवडे, विजय बोरकर, भाऊ गांधी, मिलिंद कदम, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी, यांच्यासह व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, टेम्पो संघटना व कोलाड परिसरातील विविध क्षेत्रांतील असंख्य नागरिक उपस्थित होते.
“जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी नागरिकांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके