
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.) निवडणुकीमध्ये वाटल्या जाणाऱ्या मोफत भेटवस्तू किंवा केवळ घोषणांनी आमचे प्रश्न सुटणार नाहीत. करदाते नागरिक म्हणून आम्हाला तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक प्रशासन, पाण्याचे योग्य नियोजन आणि सुरक्षित रस्ते हवे आहेत.त्यामुळे इथून पुढे लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता ही त्यांनी वाटलेल्या भेटवस्तूंवरून नाही, तर त्यांनी केलेल्या विकासकामांच्या ‘पब्लिक ऑडिट’वरून ठरवली जाईल,’ अशा शब्दांत डेक्कन जिमखाना परिसरातील नागरिकांनी ‘नागरिकांचा जाहीरनामा’ जाहीर केला.महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘डेक्कन जिमखाना परिसर समिती’च्या वतीने शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक १२) आणि डेक्कन जिमखाना- हॅपी कॉलनी (प्रभाग क्र. २९) साठी ‘नागरिकांचा जाहीरनामा’ जाहीर करण्यात आला आहे.नागरिकांच्या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या या जाहीरनाम्यात पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अनियंत्रित पुनर्विकास, प्रदूषण, अतिक्रमणे आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. समितीचे सदस्य नितीन जोशी, सुमिता काळे, बहार टेपन, अनघा बेहरे, डॉ. वैजयंती मराठे आदींनी हा जाहीरनामा तयार करण्यात सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु