
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)व्हॉट्सअपवर उमेदवारांच्या प्रचारांसाठीचे ऑडीओ क्लिप्स आपण ऐकलेच असतील... रिक्षा, व्हॅनमधून आपल्याला प्रचारगीतांचा आवाज ऐकू येत असेलच... सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या रणधुमाळीत कलाकारांचीही एंट्री झाली आहे.
प्रचारगीते, ऑडीओ क्लिप्स, व्हिडीओ, दोन ते तीन मिनिटांचे माहितीपट, पथनाट्य, पॉडकास्ट अन् प्रचारसभांचे सूत्रसंचालन यात कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या धुरळ्यात उमेदवारांसाठी कलाकारांना प्रचारगीत तयार करण्यापासून ते प्रचारासाठीच्या ऑडीओ क्लिप्स तयार करण्यापर्यंतचे काम मिळाले आहे. यामुळे कलाकारांचे चांगले अर्थार्जनही होत आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांत सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे.
उमेदरावांच्या प्रचारमोहिमांना सुरुवात झाली असून, लोककलावंत, नाट्यकर्मी, निवेदक, गायक, वादक... असे फक्त पुण्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील कलाकार प्रचारासाठीच्या कामात व्यस्तआहेत. अगदी ग्रामीण भागातील कलाकारांनाही ऑडीओ क्लिप्सला आवाज देणे असो वा प्रचारगीतांचे गायन... असे काम मिळाले आहे. याविषयी कलाकार रिद्धी कुलकर्णी म्हणाल्या, प्रचारासाठीच्या सर्वच माध्यमांसाठी मी आवाज देण्याचे काम करत आहे. ऑडीओ क्लिप्ससह माहितीपटांसाठी मी आवाज देत आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी दोन ते तीन मिनिटांचे माहितीपट तयार करून घेतले जात आहेत. त्यातून उमेदवारांच्या माहितीपासून ते त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु