राणा दाम्पत्याचं दुटप्पी धोरण उघड – सुलभा खोडके
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)। माजी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या व आमदार सुलभा खोडके यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्यावर थेट आरोप केले आहेत. “पक्षाचं नाव वेगळं आणि काम वेगळंच सुरू आहे. माज
राणा दाम्पत्याचं दुटप्पी धोरण उघड – नवनीत राणांवर सुलभा खोडकेंचा जोरदार पलटवार


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)। माजी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या व आमदार सुलभा खोडके यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राणा दाम्पत्यावर थेट आरोप केले आहेत. “पक्षाचं नाव वेगळं आणि काम वेगळंच सुरू आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी अशा प्रकारचं बोलणं शोभत नाही,” असा स्पष्ट टोला खोडके यांनी लगावला.

नवनीत राणा सातत्याने टीका करत असतील, तर त्यात काहीही अर्थ नाही, असे सांगत सुलभा खोडके म्हणाल्या की, “मागच्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाचं म्हणजे सध्या नेमकं कोण कुठल्या पक्षात आहे, हेच जनतेला कळत नाही.” त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले, “नवनीत राणा आतापर्यंत नेमक्या कुठल्या पक्षात आहेत?” राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर बोट ठेवत खोडके म्हणाल्या की, “एका कुटुंबात दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षांत काम करत आहेत. राणा दाम्पत्य दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांत सक्रिय आहे. नवरा युवा स्वाभिमान संघटनेत काम करतो, तर बायको भाजपमध्ये आहे. हा कोणता राजकीय स्पष्टपणा आहे?” भाजपमधील भूमिकेवरही त्यांनी टीका केली. “भाजपमध्ये मुख्यमंत्री यांच्या बाजूला बसून काम करता आणि त्यानंतर पुन्हा नवऱ्याच्या पक्षाचा प्रचार करायला बाहेर पडता. हे सरळसरळ दुटप्पी धोरण आहे,” असा गंभीर आरोप सुलभा खोडके यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “मला विधानसभेत पराभूत करायचं होतं, तर मैदान मोकळं होतं. तेव्हाच प्रयत्न करता आले असते,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले. पुढे त्या म्हणाल्या, “मला पाडायचं की मला जिंकवून आणायचं, हे आता २०२९ मध्ये पाहू.” सुलभा खोडके यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावतीच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले असून, राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande