गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे - विभागीय आयुक्त डॉ. गेडाम
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)। नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्क्वॉड्रनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत
गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या


नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)।

नाशिक फेस्टिव्हलचा एक भाग म्हणून भारतीय वायू दलाच्या बिदर येथील 52 स्क्वॉड्रनच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून गंगापूर धरण परिसरात 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत सूर्यकिरण एअर शो होणार आहे. या उपक्रमाचे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज दुपारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधुती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलासराव सोनवणे, एमटीडीसीचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण,

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळू पाटील आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिक शहरात प्रथमच सूर्यकिरण एअर शो होत आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याकरीता विशेष दक्षता घ्यावी. त्यासाठी गर्दी व्यवस्थापन, वाहनतळ, वाहतुकीचे परिपूर्ण नियोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना जाणे सुलभ होण्यासाठी माहितीपर फलक ठिकठिकाणी लावावेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करावे, कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक तैनात करावे, आपत्ती निवारणाचे सुयोग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्याला देशसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. या इतिहासाला उजळणी मिळावी आणि तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. एअर शोच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी रोजी सराव सत्र होईल. या शोमुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande