
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)कंधार शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या प्रसिद्ध सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दिन रफाई रहेमतुल्ला अलैह यांच्या ७११ व्या उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत हजारो हिंदू. मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.
हजरत हाजी सय्याह यांचा दर्गा श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक सलोख्याचे केंद्र म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. उरुसानिमित्त दर्याच्या दर्शनासाठी हजारो भाविक कंधारमध्ये हजेरी लावतात. जिल्हाधिकाऱ्यांकडून या दिवशी सुटी जाहीर केली जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळते.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील हाजी सय्याह यांना मानणारे भाविकही उरुसासाठी खास कंधारला येऊन श्रद्धासुमने वाहतात.उरुस समितीचे अध्यक्ष जफरोद्दिन बाहोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत दर्गातून संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात, धार्मिक प्रवचन करीत ही मिरवणूक भाविकांसह शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी नगराध्यक्ष शहाजी नळगे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय भोसीकर, माजी जि.प.सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे सहभागी झाले होते.
भाविकांना दर्शन देत ही मिरवणूक शदर्गा परिसरात दाखल झाली. मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis