
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)कोरोनाकाळात औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखाने बंद असल्याने उजनी धरणातील प्रदूषणात लक्षणीय घट झाली होती. पाणी काहिसे स्वच्छ होत जैवविविधतेला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सध्या पुन्हा एकदा औद्योगिक व शहरी सांडपाण्यामुळे उजनी धरणाचा श्वास गुदमरू लागला असून, कमालीच्या प्रदूषणामुळे ‘उजनी’चं पाणी थेट मृतावस्थेच्या दिशेने जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भिगवण व कुंभारगाव परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात पाण्याचा टीडीएस 700 पर्यंत, तर पीएच जवळपास 9 पर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील नामांकित बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या पाणी तपासणीतून ही अत्यंत गंभीर स्थिती उघडकीस आली असून, यामुळे उजनी धरणातील संपूर्ण जैवविविधतेवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु