
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)।
येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. विधी व न्याय खात्याने तशी मंदिर समितीला परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये रासायनिक प्रक्रियेचा निर्णय घेतला जाईल. रासायनिक प्रक्रियेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आज दिली.श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिरातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. या दरम्यान भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पाहणी केली होती. पाहणीनंतर मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी रासायनिक प्रक्रिया करावी लागेल, असा अहवाल मंदिर समितीला दिला होता. त्यानुसार मंदिर समितीने तो अहवाल विधी व न्याय खात्याकडे पाठवला होता. विधी व न्याय खात्याने मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी परवानगी दिली आहे.माघी यात्रेच्या पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार आहे. येत्या दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीमध्ये पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, सल्लागर समिती सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कमी गर्दीचा कालावधी विचारात घेऊन माघी यात्रेच्या पूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड