
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या अभियानामुळे नाशिक शहरातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी व्यक्त केला आहे.
या मतदार जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने महानगरपालिका व नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस रेझिंगडेचे औचित्य साधून भव्य मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव तसेच विद्यार्थ्यांना मतदार जनजागृतीची शपथ देण्यात
आली. तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वाक्षरी अभियान देखील राबविण्यात आले.
'वोट कर नाशिककर, कर मतदान, सांगतंय संविधान, मतदान सर्वश्रेष्ठ दान' अशा घोषणांनी पोलीस परेड ग्राउंड दुमदुमून गेले. पोलीस रेझिंग डे निमित्त नाशिक पोलीस विभागाकडून विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.
प्रत्येक मतदानाची टक्के वारी वाढविण्यासाठी नाशिककराने जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी केले. तर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी उपस्थितांना मतदार जनजागृतीची शपथ दिली. कार्यक्रमास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शरद काळे, महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पोलीस परेड ग्राउंड ते राजीव गांधी भवन दरम्यान भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा समारोप मतदान जागर संबळ वादनाने तसेच आकर्षक व भव्य रांगोळी साकारून करण्यात आला. यामधे मनपाचे बोध चिन्ह, निवडणूक आयोगाचे बोध चिन्ह रांगोळीद्वारे साकारण्यात आले. यावेळी 'वोट कर नाशिककर' चा जागर करण्यात आले. या प्रसंगी नाशिक महानगरपालिके चे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी शपथ घेण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV