
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 तसेच पोलिस रेजिंग डेच्या अनुषंगाने परभणी पोलिस दलाच्या शहर वाहतूक शाखेच्यावतीने परभणी शहरात हेल्मेट मोटारसायकल रॅली यशस्वीरीत्या पार पडली. ही रॅली आज बुधवार 7 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता राजगोपालचारी उद्यान येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त झाली. रॅलीदरम्यान नागरिकांचे लक्ष वेधून घेत रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
या रॅलीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी हेल्मेट परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदार्या आणि रस्ता सुरक्षेचे नियम याबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis