
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना मतदानासाठी जागरूक करण्यासाठी जागरुक नागरीक आघाडीच्या वतीने उद्या गुरुवार 8 जानेवारी रोजी दुपारी 4 ते 6 या वेळे स्टेशन रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नागरिकांना मताचा योग्य उपयोग करण्याचे महत्त्व समजावून सांगणे तसेच निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे हाच या बैठकीचा उद्देश आहे. बैठकीत नागरिकांना ‘मतदारांचा जाहिरनामा’ प्रसिध्द करणे, आपल्या प्रतिनिधींशी सतत संवाद साधण्याची संधी मिळणे आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी, यावर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील विविध प्रभागातून उमेदवार नगरसेवक पदासाठी मतदान मागत असल्याने नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या मताचा योग्य वापर करावा, तसेच शहरातील विकास कामांवर आपली अपेक्षा व्यक्त करावी, तसेच या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हेमाताई रसाळ, अॅड. माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, उल्हास खंबायतकर, ठोंबरे, सुहासिनी कावळे यांच्यासह जागरुक नागरीक आघाडीद्वारे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis