
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। १२ जानेवारी च्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५ -२६” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण राबविण्यात येणार असून, या प्रशिक्षणात संविधानासंबंधी सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.
हा राज्यस्तरीय उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग यांच्या वतीने राबविण्यात येत असून, भारतीय संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. युवकांनी संविधान समजून घेऊन जबाबदार, सजग आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नागरिक म्हणून घडावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. घर घर संविधान या संकल्पनेतून ही जनजागृती चळवळ राज्यातील प्रत्येक घरापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ही प्रश्नमंजुषा राज्यातील इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून, संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ होईल.
प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून आवश्यक अध्ययन साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने (प्रॉक्टरिंगसह) परीक्षा घेण्यात येईल. सहभागासाठी केवळ ९९ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये यासोबतच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
हा उपक्रम आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), पुणे तसेच युवा करिअर क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची संपूर्ण माहिती, नोंदणी प्रक्रिया व अधिकृत सूचना www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बनावट संकेतस्थळाला बळी न पडता केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर