
बीड, 07 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने परळी तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात जि.प. गटांच्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांपैकी केवळ सिरसाळा हा एकमेव सर्वसाधारण गट राहिला असून उर्वरित सर्व गट आरक्षित झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या राजकीय अपेक्षांना धक्का बसला आहे.
मांडवा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असले तरी प्रत्यक्ष राजकीय रणनीती पती व कुटुंबीयच ठरवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या गटातून आतापर्यंत ९ इच्छुकांची तयारी आहे. पूर्वीचा नागापूर जि.प. गट आता मोहा गटात समाविष्ट असून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. पूर्वीच्या नागापूर गटामध्ये प्रदीप मुंडेसह सुदामती गुट्टे व इतरांनी तयारी केली होती. परंतू आरक्षणामुळे मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार प्रदीप मुंडे यांना निवडणूक लढविता येणार नाही. तसेच पिंपरी गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने मागील निवडणुकीत या गटातून विजयी झालेले अजय मुंडे यांना आता सिरसाळा गटातून निवडणूक लढवावी लागेल. धर्मापुरी गट ओबीसीसाठी राखीव असून धर्मापुरीचे सरपंच अॅड. गोविंद फड यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, याच गटातून माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे नातू व विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांचे पुत्र राजवर्धन दौंड हेही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने चुरस वाढणार आहे. एकूणच आरक्षणामुळे परळी तालुक्यातील राजकारण तापले असून मर्यादित खुल्या जागांमुळे इच्छुकांची गर्दी, अंतर्गत स्पर्धा आणि राजकीय डावपेच अधिक तीव्र होणार हे निश्चित मानले जात आहे. सिरसाळा, धर्मापुरी आणि मांडवा या जिल्हा परिषद गटांतून अखेर कोणते दिग्गज उमेदवार पुढे येतात, याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis