ठाणे - ‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदाराचा यादीतील अनुक्रमांक नमूद करण्याची आयोगाकडे मागणी
ठाणे, 7 जानेवारी, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदारांना अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळावी, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रसारित ‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक दर्शविण्याची तरतूद करण्याची मागणी
ठाणे - ‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदाराचा यादीतील अनुक्रमांक नमूद करण्याची आयोगाकडे मागणी


ठाणे, 7 जानेवारी, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदारांना अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळावी, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रसारित ‘मताधिकार’ ॲपमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक दर्शविण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांना पत्रान्वये कळविले आहे.

‘मताधिकार’ ॲपच्या माध्यमातून मतदारांना विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक तसेच महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित प्रभाग क्रमांक व बुथ क्रमांकाची माहिती सहज उपलब्ध होत आहे. मात्र, संबंधित बुथवरील मतदार यादीत मतदाराचे नाव कोणत्या अनुक्रमांकावर आहे, ही माहिती उपलब्ध होत नाही, यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी क्रमांक 1 यांना संपूर्ण यादी तपासून मतदाराचे नाव शोधावे लागण्याची शक्यता असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.

ही अडचण दूर करण्यासाठी ‘मताधिकार’ ॲपच्या सर्च इंजिनमध्ये महापालिका प्रभाग क्रमांक, यादी भाग (बुथ) क्रमांकासोबत मतदाराचा अनुक्रमांक दर्शविण्याबाबत आवश्यक तरतूद व उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान व पारदर्शक होण्यास मदत होईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर, अचूक व अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ‘मताधिकार’ मोबाईल अ‍ॅप प्रभावी आणि उपयुक्त माध्यम ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदारांना घरबसल्या माहिती मिळावी, या उद्देशाने हे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून नागरिकही मताधिकार ॲप मध्ये माहिती भरून आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती घेत असून यादीतील अनुक्रमांक या ॲपमध्ये येत नसल्याचे नागरिकांनी महापालिकेस कळविले असून या अनुषंगाने महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे, तसेच मतदाराचा यादीतील अनुक्रमांक या ॲपवर उपलब्ध झाल्यास मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षांना मतदान प्रक्रिया राबविणे सुलभ होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande