
ठाणे, 07 जानेवारी (हिं.स.)। स्वच्छ सर्वेक्षण 2025–2026 अंतर्गत आज ठाणे महानगरपालिका हद्दीतील नौपाडा-कोपडी, वागळे व उथळसर प्रभागसमिती येथे व्यापक स्वरुपत सार्वजनिक शौचालय स्वच्छता Toilet Deep Clean Drive मोहिम राबविण्यात आली. आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सूचनेनुसार ही स्वच्छता मोहिम सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरू असल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी सांगितले.
ही स्वच्छता मोहिम सकाळी 10.00 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सखोल स्वच्छता, निर्जंतुकीकरण व परिसर सौंदर्यीकरण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
या अभियानांतर्गत नौपाडा-कोपडी, वागळे व उथळसर प्रभाग समितीतील प्रत्येकी 25 सुलभ शौचालये, अशा एकूण 75 सार्वजनिक शौचालये व त्यांचा परिसर सखोलपणे स्वच्छ करण्यात आला. शौचालय परिसरातील दुर्गंधी, कचरा, साचलेली माती व डाग पूर्णतः काढून टाकण्यात आले. स्वच्छतेनंतर फायलेरिया विभागामार्फत सर्व शौचालये व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेदरम्यान डांबर गोळी, एअर फ्रेशनर, फिनेल, ॲसिड, ब्लिचिंग पावडर आदी साहित्याचा वापर करून शौचालये निर्जंतुक, स्वच्छ व वापरास योग्य करण्यात आली.
पाण्याचा पुनर्वापर या संकल्पनेनुसार STP कोपरी, ठाणे येथील शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे स्वच्छतेसाठी ताज्या पाण्याचा वापर टाळण्यात आला. प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत 04 लहान जेटिंग मशिन्स व 02 उच्च दाबाची मोठी जेटिंग मशिन्स अशा एकूण 06 जेटिंग मशिन्स तैनात करण्यात आल्या. या अत्याधुनिक जेटिंग मशिन्सच्या सहाय्याने शौचालयातील मजले, भिंती, ड्रेनेज लाईन्स तसेच सभोवतालचा परिसर उच्च दाबाच्या पाण्याने धुवून काढण्यात आला.
या मोहिमेत उपायुक्त उपआयुक्त मधुकर मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह शयुराज कांबळे, पंजाबराव कवळे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, प्रवीण बनोटे, संजू रणदिवे, अजय जगताप, सुनील जगताप तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे 250 कर्मचारी सहभागी झाले होते.
महानगरपालिका प्रशासनाकडून ठाणेकर नागरिकांना स्वच्छता हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवावीत व शहर स्वच्छतेसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर