
नांदेड, 08 जानेवारी (हिं.स.)। श्री रेणुकादेवी संस्थान माहूर येथील सेवेत गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ठराव क्रमांक ३ नुसार सर्व विश्वस्त मंडळाच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार संबंधित ६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्ती पदावर व नमूद वेतनश्रेणीत कायम करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
हे आदेश श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्र दोनतुला यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पारित करण्यात आलेआहेत. राज्यातील जगदंबा संस्थान, मोहटादेवी व सप्तशृंगी निवासिनी देवस्थान, नाशिक येथील नियमांच्या धर्तीवर श्री रेणुकादेवी संस्थान माहूर येथील कर्मचाऱ्यांनाही सेवा नियम, वेतनश्रेणी व कायमस्वरूपी नियुक्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अनेक वर्षांपासून संस्थानात कार्यरत कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा बजावत होते. त्यांना कर्तव्ये, अधिकार, रजा नियम, सेवा नियम निश्चित करून देण्यात यावेत, यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी निवेदनेही सादर केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळाल्याने माहूरगडावर कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचारी वर्गाच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis