रेझिंग डे निमित्त पनवेल तालुक्यात पोलिस पाटलांचे मार्गदर्शन शिबिर
रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक तसेच पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटलांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुका, सण-उत्सव, तसेच का
रेझिंग डे निमित्त पनवेल तालुक्यात पोलिस पाटलांचे मार्गदर्शन शिबिर


रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक तसेच पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटलांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुका, सण-उत्सव, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीत मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी पोलीस वर्धापन दिनाचे महत्त्व सांगून पोलीस पाटील हे गावपातळीवरील पोलीस यंत्रणेचे महत्त्वाचे दुवे असल्याचे स्पष्ट केले. बालविवाह रोखण्यासाठी संशयास्पद घटना अथवा माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच बालविवाह, नशामुक्ती, सायबर गुन्हे याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटलांची भूमिका महत्त्वाची असून निवडणूक काळात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मकर संक्रांत, माघी गणेशोत्सव, २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन या कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांच्या सुरक्षेवर भर देत संशयित वस्तू, वाहने अथवा इसम यांची माहिती त्वरित देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अवैध धंदे, नव्याने आलेले भाडेकरू यांची माहिती संकलित करणे, तसेच सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डायल ११२, सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० व १९४५, तसेच कोस्टल गार्ड हेल्पलाईन १०९३ यांची माहिती देऊन पोलीस बतावणीपासून नागरिकांना सावध करण्याचे निर्देश देण्यात आले. व्यक्ती किंवा कुटुंबाला वाळीत टाकण्यासारखे प्रकार घडू नयेत, याबाबत दक्षता घेण्याचेही स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande