
नांदेड, 8 जानेवारी, (हिं.स.)। धर्माबाद शहरातील पाणीपुरवठयाची जुनी पाईप लाईन ६० वर्षीपूर्वीची असल्यामुळे अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. परंतु महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील जनतेला शुध्द पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडून ७१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेच्या कामाचा नगराध्यक्षा सौ. संगीता शंकर बोलमवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
या योजनेचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष स्व. विनायकराव कुलकर्णी यांनी सन २०१५ मध्ये सुरू केला होता. त्यांनतर सन २०१६ मध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या वेळेस थेट नगराध्यक्ष बनल्या होत्या काँग्रेसच्या श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते. भाजपाचे ४ नगरसेवक निवडून आले होते. काही काँग्रेसचे नगरसेवक तर काही इतर नगरसेवक निवडून आल्यामुळे अंदाजे २ वर्षाचाकार्यकाळ सुरळीत पार पडला. त्यांनतर नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे शहराचा विकास रखडला होता. तसेच सदर योजनेच्या पाठपुराव्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. तत्कालीन मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता तसेच कर्मचाऱ्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. सदर पाणीपुरवठयाची योजना मंजूर व्हावी यासाठी पुण्यनगरीने वारंवार बातम्या प्रकाशित केल्या होत्या. ही योजना शासन स्तरावर मंजूर करून घेण्यासाठी आमदार राजेश पवार यांचे सहकार्य लाभले. या योजनेच्या कामाचा शुभारंभ मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोल्लमवाड यांनी करण्याचे आश्वासन प्रचारादरम्यान दिले होते.
ज्या भागात पाण्याची टंचाई आहे. त्या भागातूनच कामाची सुरुवात केली जाईल असेही बोलमवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार ७१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. संगीता शंकर बोलमवाड यांच्या हस्ते झाला. त्यामुळे रामनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या योजनेचे काम दीड वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे. या कामानंतर प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लीटर शुध्द पाणीपुरवठा होणार आहे. सदर योजनेचे काम शहरातील गल्लीबोळातून ९५ किलोमीटर पाईप लाईनद्वारे पूर्ण होणार आहे. धर्माबाद शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून दर्जेदार काम होणार असल्याचे नगराध्यक्षा सौ. बोलमवाड यांनी सांगितले. या योजनेतील पाईपलाइनला पुढील ५० वर्षे धक्का लागणार नाही. त्यामुळे शहरातील जनतेला अंदाजे दीड वर्षानंतर पिण्यासाठी शुध्द पाणी मिळणार असल्याचे चित्र दिसत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis