
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)।पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपला संकल्पनामा जाहीर केला. पुढील पाच वर्षांत महापालिकेच्या स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून शहराचा विकास करण्यापेक्षा केंद्र व राज्य सरकारच्या निधीच्या भरवशावर भर देण्यात आल्याचे या संकल्पनाम्यातून स्पष्ट होते. शहराच्या चारही दिशांना मेट्रोचा विस्तार, विमानतळाचा विस्तार, महामार्गांचे रुंदीकरण, एआय प्रणालीचा वापर, मध्यमवर्गीयांसाठी हक्काची घरे यासह अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या व प्रगतीपथावरील कामांचाही यात आढावा घेण्यात आला आहे. भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत हा ३४ पानी संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. संकल्पनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची माहिती देण्यात आली असून, सात पाने ही गेल्या दहा वर्षांतील कामांसाठी राखीव आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु