
अमरावती, 8 जानेवारी, (हिं.स.)।
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षांतर्गत मतभेद कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे काही इच्छुक नाराज आहेत, त्यामुळे त्यांना प्रचारात सक्रिय करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांची बैठक घेऊन पक्ष निरीक्षक समजूत काढत आहेत. पण, उमेदवारीसाठी इच्छुकांची नाराजी दूर होत नसल्याचे दिसत आहे. खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या नाराजांना काँग्रेसमध्ये खेचून शहरात पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
नेत्यांकडून समजूत
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने काही काळ नाराज असलेले इच्छुक आता नेत्यांच्या समजुतीनंतर पुन्हा प्रचारात सक्रिय होतील का, की निवडणुकीपासून दूर राहतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्ष कमी होऊन प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. ज्यांची नाराजी दूर झाली नाही, असे कार्यकर्ते आपल्या विरोधात प्रचार करणार का? अशी भीती उमेदवारांना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी