फुलंब्री येथे 9 व 10 जानेवारीला राष्ट्रीय क्रीडा विज्ञान परिषद; देशभरातून 372 तज्ज्ञांची नोंदणी
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.) — फुलंब्री येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे “प्राचीन भारतीय पारंपरिक क्रीडा ज्ञानप्रणाली आणि आधुनिक नवकल्पना” या विषयावर शुक्र
फुलंब्री येथे 9 व 10 जानेवारीला राष्ट्रीय क्रीडा विज्ञान परिषद; देशभरातून 372 तज्ज्ञांची नोंदणी


छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.) —

फुलंब्री येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे “प्राचीन भारतीय पारंपरिक क्रीडा ज्ञानप्रणाली आणि आधुनिक नवकल्पना” या विषयावर शुक्रवार व शनिवार, 9 व 10 जानेवारी रोजी राष्ट्रीय क्रीडा विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेसाठी देशभरातून 372 क्रीडा प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, संशोधक विद्यार्थी व क्रीडाप्रेमींनी नोंदणी केली आहे. योग, पारंपरिक खेळ व भारतीय व्यायामपद्धतींचा आधुनिक विज्ञानाच्या आधारे अभ्यास होणे ही काळाची गरज असून, त्याच उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील यांनी दिली.

परिषदेसाठी देशातील नामवंत तज्ज्ञ निमंत्रित व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये तेलंगणचे माजी कुलगुरू व तेलंगण लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. लक्ष्मीकांत राठोड, शारीरिक शिक्षणातील तज्ज्ञ प्रा. डॉ. निरज जैन, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक प्रा. डॉ. राजेश कुमार, पश्चिम बंगाल येथील प्रा. डॉ. निता बंडोपाध्याय, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रा. डॉ. मीनाक्षी पहुजा, राष्ट्रपती पुरस्कार विजेते व भारतीय शारीरिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉ. पियुष जैन यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांचा समावेश आहे, अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख डॉ. संदीप जगताप यांनी दिली.

परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, साईच्या संचालिका डॉ. मोनिका घुगे, डॉ. मकरंद जोशी, डॉ. बप्पासाहेब मस्के, प्रा. डॉ. शिवाजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत शहरातील निवृत्त क्रीडा संचालक तसेच उदयन्मुख दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष टकले यांनी दिली.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, सदस्य प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, प्राचार्य डॉ. सुभाष टकले, विनायक राऊत, सुरेश पठाडे आदी उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande