लोहा पंचायत समितीच्या बीडीओंना धक्काबुक्की; गुन्हा दाखल
नांदेड, 08 जानेवारी (हिं.स.)। लोहा येथील पंचायत समिती कार्यालयात कर्तव्य बजावत असताना गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र मधुकरराव कुलक
लोहा पंचायत समितीच्या बीडीओंना धक्काबुक्की; गुन्हा दाखल


नांदेड, 08 जानेवारी (हिं.स.)।

लोहा येथील पंचायत समिती कार्यालयात कर्तव्य बजावत असताना गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेंद्र मधुकरराव कुलकर्णी हे लोहा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी असून दैनंदिन कामकाज पाहत होते. यावेळी कार्यालयाबाहेर आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता बालाजी अर्जुन शिंदे (रा. लोहा) हा घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे दिसले. 'तुम्ही

कामे व्यवस्थित करत नाहीत, असे म्हणत तो कर्मचाऱ्यांशी वाद घालत होता. गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर बालाजी शिंदे याने आरडाओरडा करत थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. सेवक खंडू वाघमारे यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता शिंदे याने त्यांना धक्काबुक्की करत गटविकास अधिकाऱ्यांच्या टेबलावर हात मारून शिवीगाळ केली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी श्याम गुंडावार, शिवकुमार घोडके, संतोष गायकवाड व इतर अधिकारी मदतीसाठी धावून आले. सर्वांसमोर शिवीगाळ करून शिंदे तेथून निघून गेला. याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande