
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.) : राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागाच्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत 3B प्रलंबित विवरणपत्र पूर्तता मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेला करदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 96.70 टक्के करदात्यांनी आपली प्रलंबित 3B विवरणपत्रे सादर करून कार्यवाही पूर्ण केली आहे.
जीएसटी कायद्यानुसार करदात्यांना निर्धारित कालावधीत विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वेळेत विवरणपत्र न भरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत अनेक करदात्यांनी 3B विवरणपत्र वेळेत सादर न केल्याने विभागाने ही विशेष पूर्तता मोहिम हाती घेतली.
या मोहिमेअंतर्गत एकूण 74,371 करदात्यांपैकी 71,922 करदात्यांनी नोव्हेंबर 2025 पर्यंतची 3B विवरणपत्रे दाखल केली आहेत. उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पूर्तता झाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. उर्वरित करदात्यांवर वस्तू व सेवा कर अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील सर्व व्यवसाय कर नोंदणीकृत आस्थापनांकडून प्रलंबित व्यवसाय कराची वसुली करण्यात यावी आणि कसूरदार आस्थापनांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रातील सर्व व्यवसाय कर अधिकाऱ्यांना दिले आहेत.
व्यवसाय कर हा रोजगार, व्यवसाय किंवा व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आकारला जाणारा राज्यस्तरीय कर असून तो महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि रोजगार कर कायदा, 1975 अंतर्गत लागू आहे. हा कर वेतनधारक कर्मचाऱ्यांसह स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकांनाही लागू होतो.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis