
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। सासवड आणि पुणे शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग बुधवार पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने घेतला आहे. बोपदेव घाटामध्ये सध्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच विस्तारीकरणाची महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कोणताही अपघात किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु