
नांदेड, 08 जानेवारी (हिं.स.)। कंधार तालुक्यातील स्वप्नभूमीनगर येथे महावितरण (महापारेषण) कंधार उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गयाबाई विठ्ठल माडगे (रा. स्वप्नभूमीनगर, कंधार) यांचा ३३ केव्ही वीजवाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या परिसरात ३३ केव्हीची मेन लाईन अवघ्या ५ फुटांवर धोकादायक अवस्थेत लोंबकळत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही दुरुस्ती न झाल्याने अखेर एका कुटुंबावर काळाने घाला घातला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर
कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी स्वप्नभूमीनगर येथे माडगे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी माडगे दाम्पत्याच्या २ मुलांचे पालकत्व स्वीकारत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या संकटात तुम्ही एकटे नाही, काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे शब्द देत त्यांनी कुटुंबाला धीर दिला.
गयाबाई माडगे यांच्या पश्चात पती, मुलगा व २ मुली असापरिवार आहे. घरातील कर्त्या स्त्रीच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना कसा बसतो याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, बालाजी येईलवाड, देविदास गोटमवाड, काशीनाथ घुमे, विठ्ठल माडगे, माधव गोटमवाड, नारायण गोटमवाड व परिवारातील सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis