
बीड, 08 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ दि.११ जानेवारी रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकुण १२ उपकेंद्रामधून सकाळी ११ ते १२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेसाठी एकूण २८५० उमेदवार बसलेले असून सदर परिक्षा सुरळीत पार पाडणेकरीता १२ उपकेंद्रप्रमुख, १२ मदतनीस, ४८ पर्यवेक्षक, १४६ समवेक्षक असे एकूण २१८ अधिकारी / कर्मचारी यांची जिल्हा प्रशासनाव्दारे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना द जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे निवासी उपजिल्हाधिकारी बीड तथा जिल्हा केंद्राप्रमुख यांनी सदर परिक्षेचे अनुषंगाने प्रशिक्षण दिले.
परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२५ चे कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार सदर परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांचेकडील मोबाईल, पेजर,
कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येणार नाही. आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारांना जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बॉटल घेऊन येण्यास परवानगी देण्यात येत आहे.
उमेदवारांना त्यांचे परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहणेबाबत याव्दारे सूचित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजेनंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव प्रवेश देण्यात येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis