
बीड, 08 जानेवारी (हिं.स.)।
तालुक्यातील रायमोह जवळील येवलवाडी येथील पवित्र जालिंदरनाथ मंदिरात दानपेटी चोरीची घटना घडून तब्बल एक महिना उलटून गेला तरी अद्याप चोरट्यांना अटक झालेली नाही. विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असतानाही तपासात कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने नाथ भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येवलवाडी येथे नवनाथांपैकी एक असलेल्या जालिंदरनाथांची संजीवन समाधी असून, ही भूमी नाथपंथीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. गर्भगिरीच्या नाथ परंपरेत मच्छिद्रनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ
व कानिफनाथ यांचे विशेष स्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून हजारो नाथ भक्त जालिंदरनाथांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. दोन ते तीन चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचलून नेल्याची घटना घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, दानपेटी काही अंतरावर सापडली; मात्र त्यातील रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती तपासी अधिकारी एपीआय तागड यांनी दिली आहे. मात्र तपासाची चक्रे वेगाने फिरवावीत, अशी ठाम मागणी नाथ भक्तांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis