
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। वैजापूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणी प्रभारी प्रकल्प अधिकारी यांच्या ऐवजी कायमस्वरूपी महिला प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच प्रकल्पाच्या सर्व बँक खात्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राज्य सचिव कॉ. शालिनी पगारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
त्या अंतर्गत ३९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये तेवढ्याच संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. मात्र, या प्रकल्पाला नियमित व स्थायी प्रकल्प अधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
येत्या १० जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १२ जानेवारी रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावरराज्यसचिव शालिनी पगारे, तालुका अध्यक्ष शोभा तांदळे, उपाध्यक्ष सोनी चव्हाण, अनिता मतसागर, बिजला काळे, लंका जगधने, भारती जाधव, वैशाली धाडबळे, यांच्या सह्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis