
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील पालोद ता. सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा शुभारंभ शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनीकेला. प्रारंभी खेळणा मध्यम प्रकल्पात जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.खेळणातुन आवर्तन सोडण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी सप्टेंबर अखेरच खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफलो झाला होता. आज मितीला खेळणा धरणात 81 टक्के जलसाठा आहे. त्याअनुषंगाने सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने यामुळे 2 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून रब्बी पिकांना लाभ होणार आहे. शिवाय परिसरातील विहिरींनाही फायदा होणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पन्नात वाढ होईल , खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने सिल्लोड तालुक्यातील ,पालोद, मंगरुळ, दहेगाव, अन्वी, डोंगरगाव, तर भोकरदन तालुक्यातील आव्हाणा, सुभानपुर, मालखेडा येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याप्रसंगी आमचे पदाधिकारी, गावकरी, परीसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis