अमरावतीत महापालिका निवडणूक प्रचाराला वेग
लाल गंधाचा टिळा’ लावून उमेदवार मतदारांच्या भेटीला अमरावती, ०९ जानेवारी (हिं.स.)। अमरावती शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला असून, ‘लाल गंधाचा टिळा’ कपाळावर, अंगावर पांढरे शुभ्र कपडे आणि गळ्यात पक्षाचा रुमाल असा देखावा सध्या सर्वत्र
अमरावतीत महापालिका निवडणूक प्रचाराला वेग


लाल गंधाचा टिळा’ लावून उमेदवार मतदारांच्या भेटीला

अमरावती, ०९ जानेवारी (हिं.स.)।

अमरावती शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला असून, ‘लाल गंधाचा टिळा’ कपाळावर, अंगावर पांढरे शुभ्र कपडे आणि गळ्यात पक्षाचा रुमाल असा देखावा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. सकाळी-सकाळीच उमेदवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याने शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

महापालिकेच्या ८७ जागांसाठी तब्बल ६६१ उमेदवार रिंगणात उतरले असून, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहे. कार्यकर्त्यांची कमतरता भासत असल्याने अनेक उमेदवारांनी संपूर्ण कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. सकाळी सहा वाजता उठून स्नान, कपाळावर टिळा, पक्षाचा रुमाल परिधान करून उमेदवार प्रचारासाठी सज्ज होतात. सकाळी साडेसातच्या सुमारास चहा घेत घराबाहेर पडत कॉलनी, गल्ली आणि रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक मतदाराला नम्रपणे नमस्कार करून “मी निवडणुकीत उभा आहे, थोडं लक्ष द्या,” अशी विनंती केली जात आहे.

सकाळच्या वेळेत कार्यकर्त्यांसह मुख्य प्रचारफेरी, दुपारी बैठका व वैयक्तिक गाठीभेटी, संध्याकाळी पुन्हा प्रचारफेरी आणि रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवसाच्या नियोजनासाठी चर्चा असा उमेदवारांचा दिनक्रम बनला आहे.

अपार्टमेंटच्या पायऱ्यांवर उमेदवारांची दमछाक

प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार मॉर्निंग वॉकची ठिकाणे, उद्याने, मंदिरे, चहाच्या टपऱ्या तसेच सलूनपर्यंतही भेटी देत आहेत. मात्र लिफ्ट नसलेल्या उंच अपार्टमेंटमध्ये पायऱ्या चढताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. तरीही “साहेब, यावेळी लक्ष ठेवा,” अशी आर्जव करत मतदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कार्यकर्त्यांची सोय, महिलांना रोजगार

उमेदवारांनी प्रचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची चांगली सोय केली आहे. महिला व पुरुष कार्यकर्त्यांसाठी जेवण-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली असून, काही उमेदवारांनी मंगल कार्यालये, हॉल किंवा स्वतःचे बंगले महिनाभरासाठी आरक्षित केले आहेत. तर काहींनी थेट खाणावळींशी करार करून प्रचार यंत्रणेला गती दिली आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande