
रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)।
वेगवान जीवनशैली, कामाचा वाढता ताण, आर्थिक अडचणी, व्यसनाधीनता, संशय, संवादाचा अभाव तसेच मानसिक-शारीरिक छळ यांमुळे वैवाहिक नात्यांवर ताण वाढत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. किरकोळ वादांपासून सुरू होणारे मतभेद कालांतराने गंभीर स्वरूप धारण करून थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहेत. अशा तुटण्याच्या मार्गावर असलेल्या नात्यांना वाचविण्यासाठी रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने लोकअदालतीच्या माध्यमातून दिलासा देणारी भूमिका बजावली आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींमधून तब्बल १९ विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले आहे. घटस्फोटासाठी न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे अंतिम टप्प्यावर जाण्याआधीच लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली. येथे पारंपरिक न्यायालयीन वातावरणाऐवजी समुपदेशन, संवाद आणि समजुतीचा मार्ग स्वीकारण्यात आला. परिणामी अनेक पती-पत्नींनी गैरसमज दूर करून एकमेकांना पुन्हा स्वीकारले.
लोकअदालतीत दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले जाते. वादाची मूळ कारणे समजावून घेतली जातात. जबाबदाऱ्या, कुटुंबाचे भविष्य, मुलांचे हित आणि भावनिक नात्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते. या प्रक्रियेमुळे राग, अहंकार व संशय कमी होऊन संवादाचा नवा मार्ग खुला होतो. न्यायालयीन संघर्ष टाळून नाते टिकविण्याचा सकारात्मक निर्णय अनेक जोडप्यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. लोकअदालतीतील तपशीलानुसार २२ मार्च २०२५ रोजी ४, १० मे रोजी ५, १३ सप्टेंबर रोजी ५ आणि १३ डिसेंबर रोजी ५ असे एकूण १९ संसार पुन्हा सुरळीत झाले. चार लोकअदालतींमधून मिळालेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १४ मार्च रोजी पुन्हा लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तुटण्याच्या मार्गावर असलेले नाते वाचवू इच्छिणाऱ्या जोडप्यांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके