
अंबरनाथ, 09 जानेवारी (हिं.स.)। अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आणि एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि एका अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ 32 वर जाऊन बहुमताचा आकडा पार झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि एका अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा पूर्ण झाला आहे. लवकरच शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्ता स्थापनेचा औपचारिक दावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तांतरावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेतील एकूण 59 जागांपैकी शिवसेनेकडून 27, भाजपकडून 14, काँग्रेसकडून 12, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 4 आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा पाठिंबा घेत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापनेचा दावा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. भाजप–काँग्रेसच्या या आघाडीवर राज्यात सर्वत्र टीका झाली होती. त्यानंतर काँग्रेसने अंबरनाथमधील सर्व 12 नगरसेवकांचे पक्षातून निलंबन केले आणि पुढे त्यापैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती, तर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या आघाडीसंबंधी प्रश्न उपस्थित करत भाजप नेतृत्वाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली होती. अंबरनाथच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करून शिवसेनेला सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुमताच्या जवळ पोहोचवले असून भाजप–काँग्रेस आघाडीला नाकारल्याचा संदेश दिला आहे, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule