छ. संभाजीनगर - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विकसित, संरक्षित, स्वच्छ व रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प यात मांडण्य
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विकसित, संरक्षित, स्वच्छ व रोजगारक्षम छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प यात मांडण्यात आला.

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील प्रेसिंडेट लॉन्स येथे हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. याप्रसंगी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, किरण पाटील, बसवराज मंगरुळे, शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते. या जाहीरनाम्यात नवीन पाणीपुरवठा योजना, ६८५ कोटी रुपयांच्या निधीतून शहरात रस्त्यांची झालेली कामे यासह अन्य कामांचा गोषवारा देण्यात आला.

आगामी २५ वर्षांच्या विकासाचे नियोजन करुन ठोस उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीरमान्यात भाजपने नमूद केले. यात जालना रोड ओलांडण्यासाठी भुरारी मार्ग, चिकलठाणा ते वाळूजदरम्यान एकसलग उड्डाणपुल, शेंद्रा ते वाळूज व बिडकीन ते हसूल निओ मेट्रोसाठी प्रयत्न करणार. गाठठाण, गुंठेवारी भागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महापालिकेच्या अटी शिथील करणार. प्रत्येक घराला पीआर कार्ड देणार. शहराला एक ऐवजी दोन ते तीनपर्यंतचे सरसकट वाढीव चटईक्षेत्र मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. कचरा व्यवस्थापन, रस्ते सुशोभीकरण व प्रत्येक रस्त्यावर सोलार पथदिवे द्वारे शहराचे रंगरुप बदलणार. छत्रपती संभाजीनगर मेट्रो रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीची स्थापन प्रस्तावित असून या प्राधिकरणाचे कामकाज त्वरित सुरू करणार. वाहतुकीचे प्रभावी नियोजन, ट्रान्सपोर्टनगरीची उभारणी, सर्व प्रभागांत सुसज्ज भाजी मंडई, पार्किंगची सुविधा करणार. नवा रिंग रोड करणार, रस्ते विकासावर भर, खड्डेमुक्त प्रवास हे लक्ष असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. ज्येष्ठ व मुलांसाठी डे केअर सेंटर व विरंगुळा केंद्राची उभारणी करणार, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. सिटी बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत, पालिकेची २० टक्के खरेदी महिला बचतगट व महिला संस्थाकडून करू, आदी आश्वासने देण्यात आली आहेत.

मालमत्ता बेबाकी प्रमाणपत्र, जन्म मृत्यू प्रमाणपत्रे, विशिष्ट मर्यादेतील इमारतींचा बांधकाम परवाना अशा बाबी ऑनलाइन करणार. विमानतळ परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणार. जायकवाडीवर फ्लोटिंग सोलार पॅनेल्स उभारणार. यासह महापालिकेच्या खुल्या जागांमध्ये सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारणार. यासह शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यासह अन्य क्षेत्रातील विकासकामांबाबत या जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आल्या आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande