रत्नागिरी : पहिले राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी सहकार साहित्य संमेलन फेब्रुवारीत
रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिले राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी सहकार साहित्य संमेलन मांडकी पालवण (ता. चिपळूण) येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण तानाजीराव चोरगे संमेलनाचे अध्यक्ष असतील, तर ज्येष्ठ न
पत्रकार परिषद


रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिले राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी सहकार साहित्य संमेलन मांडकी पालवण (ता. चिपळूण) येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक कृषिभूषण तानाजीराव चोरगे संमेलनाचे अध्यक्ष असतील, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक ॲड. दीपक पटवर्धन, गजानन पाटील, जयवंत जालगावकर, राजेंद्र सुर्वे, संयोजन समितीचे अरुण इंगवले, धीरज वाटेकर, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले की, या संमेलनाच्या उ‌द्घाटनासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, तर समारोपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. संमेलनात विविध सहा विषयांवरील परिसंवाद होणार आहेत. त्यामध्ये त्या त्या क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर सहभाग घेणार आहेत. बचत गटांसह कृषिविषयक स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह संमेलनाला महाराष्ट्रातून साहित्यिक, प्रगतिशील शेतकरी, सहकारातील कार्यकर्ते, कृषी तज्ज्ञ हजर असणार आहेत.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande