
नाशिक, 9 जानेवारी, (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याने मतदानाच्या वेळेत मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त विजय वाघमारे यांनी दिले. वाघमारे यांनी काल राज्यातील सर्वच महापालिकेच्या आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. त्यात मतदान केंद्रांची तयारी, कायदा व सुव्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्रे व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.
मतदान केंद्रावर बुथनिहाय व्यवस्था केली असेल तर अशा प्रत्येक बुथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, मतदान केंद्रात मतदारांची गर्दी होणार नाही व प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, अशी व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी. तसेच अपंग मतदारांसाठी रॅम्प आहेत की नाही याची अधिकाऱ्यांनी स्वतः खात्री करावी, अशा सूचना दिल्या. स्थानिक निवडणूक असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांची पळवापळवी, डांबून ठेवण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी अगोदरपासूनच काळजी घेण्याबरोबरच मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा. शिवाय पोलीस यंत्रणेने संवेदनशील मतदान केंद्रांचा प्रभागनिहाय आढावा घेवून ज्या मतदान केंद्रावर यापूर्वीच्या निवडणुकीत गोंधळ घालण्याचे प्रकार घडले आहेत, अशा मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावेत व संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करताना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेवून पाहणी करावी, अशा सूचना मुख्य निवडणूक आयुक्त विजय वाघमारे यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV