ठाणे-घोडबंदर दरम्यान गायमुख घाटाजवळ भीषण अपघात; ११ वाहनांचा चुराडा, चार जखमी
ठाणे, 09 जानेवारी (हिं.स.)। ठाणे–घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणारा टाटा कंपनीचा कंटेनर ठाण्याकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्
Thane Gaimukh Ghat


Gaimukh Ghat Thane-Ghodbunder


Gaimukh Ghat Thane-Ghodbunder


ठाणे, 09 जानेवारी (हिं.स.)। ठाणे–घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणारा टाटा कंपनीचा कंटेनर ठाण्याकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल अकरा वाहनांना जोरदार धडक देत हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव (५६) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर प्रवासी तस्किन शेख (४५) आणि अनिता पेरवाल (४५) यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. कारचालक रामबली बाबूलाल (२२) यांना कमरेला गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही प्रवाशांनी किरकोळ दुखापतीनंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कंटेनरमध्ये ३५ ते ४० टन सिमेंटच्या गोण्या होत्या आणि उतरणीवर नियंत्रण गेल्यानंतर त्याने समोरून येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा सिटी, वॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोव्हा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसेच ऑटो रिक्षा अशा अकरा वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचा चुराडा झाला आहे.

अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. घटनास्थळी कासारवडवली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती पसरवून पुढील अपघातांचा धोका कमी केला.

या अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही दिशेच्या वाहतुकीत जवळपास दोन तास मोठी कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अपघातग्रस्त सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम कासारवडवली पोलीस सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय याबाबत तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande