
प्रभारी मुख्याधिकार्याच्या कथित गैरकारभाराविरोधात 11 दिवसांपासून बेमुदत उपोषण
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)।
नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कथित गैरकारभाराची चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणास 11 दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या उपोषणकर्त्याने शुक्रवारी (दि. 9) सार्वजनिकरीत्या मुंडन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
‘सुजान नागरिक अन्याय व भ्रष्टाचारविरोधी जनजागृती व निर्मूलन समिती’चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास राधाकिशन उघडे हे 29 डिसेंबरपासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्यावर शहरातील नगर परिषदेच्या मोकळ्या जागांचे नियमबाह्य वाटप, खासगी व्यक्तींच्या मदतीने शासकीय नोंदींमध्ये फेरफार तसेच डिजिटल बोर्डच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या निषेधार्थ उपोषण सुरु केले आहे. परंतु, उपोषणाचा अकरावा दिवस उलटूनही वरिष्ठ पातळीवरून अथवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत असतानाही प्रशासन संवेदनशून्य भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. या निष्क्रियतेच्या निषेधार्थ श्रीनिवास उघडे यांनी शुक्रवारी सार्वजनिकरित्या मुंडन करून आंदोलन तीव्र केले. मागण्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही उघडे यांनी दिला आहे. जोपर्यंत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis