विकासाच्या गाडीचा चालक म्हणून भाजपाच्या नगरसेवकांची निवड करा - बावनकुळे
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। येणाऱ्या १५ तारखेला आपण महानगरपालिकेसाठी नगरसेवक निवडणार नाही तर लातूरचे भवितव्य ठरविणार आहोत. लातूर शहराच्या विकासाचा रथ गतीने चालविण्यासाठी प्रतिनिधी निवडणार आहोत. विकासाच्या या गाडीचा चालक म्हणून भाजपच्या नगरसेवकांची
विकासाच्या गाडीचा चालक म्हणून भाजपाच्या नगरसेवकांची निवड करा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे :


लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। येणाऱ्या १५ तारखेला आपण महानगरपालिकेसाठी नगरसेवक निवडणार नाही तर लातूरचे भवितव्य ठरविणार आहोत. लातूर शहराच्या विकासाचा रथ गतीने चालविण्यासाठी प्रतिनिधी निवडणार आहोत. विकासाच्या या गाडीचा चालक म्हणून भाजपच्या नगरसेवकांची निवड करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लातूर शहर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे प्रभाग क्र. १४ मधील उमेदवार करुणा शिंदे, उध्दव तेलंगे, स्वाती घोरपडे व रविशंकर जाधव तसेच प्रभाग क़ १६ मधील उमेदवार, राजर्श्री धोत्रे, विनय जाकते, शितल मालू व गिरीष पाटील यांच्या प्रचारासाठी गजराज पॅलेस व कॉईल नगर येथे झालेल्या सभेत बावनकुळे यांनी हे आवाहन केले.

या दोन्ही सभांना निवडणुक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, संघटन सरचिटणीस संजय कौडगे, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी खा. सुधाकर श्रृंगारे, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सभांना संबोधित करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय शहराचा विकास शक्य नाही. सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन करणाºया केंद्र आणि राज्य सरकारसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया १२४ योजना आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महानगर पालिकेत भाजपाचा महापौर व नगरसेवक आवश्यक आहे. विकासाची गाडी चार चाकांची आहे. पहिले चाक मोदी सरकारचे, दुसरे देवाभाऊच्या सरकारचे, तिसरे चाक जिल्हा नियोजन समिती म्हणजे पालकमंत्र्यांचे आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था हे चौथे चाक आहे. राज्यात कार्यरत मंत्री व आमदार, खासदार हे या गाडीचे इंधन आहेत. भाजपाचा महापौर या गाडीचा चालक असेल तर आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांना व त्या माध्यमातून जनतेला विकासाच्या गाडीत बसता येईल. विकासाचा हा रथ गतीने चालावा यासाठी तसेच आपल्या शहराच्या भवितव्यासाठी भाजपाला निवडून द्या. आपल्यासह परिसरातील दहा मतदारांना घेवून भाजपाला मतदान करा, असे आवाहन ना. बावनकुळे यांनी केले.

ते म्हणाले की, आपण जे मतदान कराल ते आमच्यावर कर्ज असेल, त्याचे जामिनदार देवाभाऊ असतील. आपल्या कर्जाची विकासाच्या माध्यमातून व्याजासह परतफेड करू, असेही बावनकुळे म्हणाले. कॉईलनगर येथे प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी शहरातील समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली. प्रभाग १४ मधील सभेत रविशंकर जाधव यांनी प्रास्ताविक केले.

कबाले मंत्री म्हणून ओळख

आपल्या भाषणात महसुल मंत्री बावनकुळे म्हणाले की, शहरात शासकीय जागेत अनेकांच्या झोपड्या आहेत. या सर्वांना कबाले मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. राज्यात कबालेमंत्री म्हणूनच मला लोक ओळखतात. केवळ कबालेच नव्हे तर त्या जागेवर घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करू. बांधकामासाठी मोफत वाळू देवू, असेही ते म्हणाले.

चार महिन्यात अवैध धंदे बंद करू

आपल्या भाषणात ना. बावनकुळे म्हणाले की, लातूर शहरात अवैध धंदे वाढत असल्याची तक्रार अनेक जण करत आहेत.पुढील चार महिन्यात हे सर्व अवैध धंदे बंद करू. शहरातील नागरिकांनी अवैध धंद्याबाबत थेट आपल्याशी संपर्क साधावा. शहरात ज्या भागात पोलिस चौक्या आवश्यक आहेत तेथे तात्काळ चौक्या उभारण्यास मंजूरी दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande