'जे मनात तेच मनपात'; महायुतीचा कोल्हापूरसाठी कर्तव्यनामा
कोल्हापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीसाठी महायुतीने आज ''जे मनात तेच मनपात'' ही संकल्पना घेऊन संयुक्त पत्रकार परिषदेत कर्तव्यनामा मांडला. महायुतीचे नेते पालकंमत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ,
महायुतीचे नेते कर्तव्यनामा जाहिर करताना


कोल्हापूर, 09 जानेवारी (हिं.स.)।

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीसाठी महायुतीने आज 'जे मनात तेच मनपात' ही संकल्पना घेऊन संयुक्त पत्रकार परिषदेत कर्तव्यनामा मांडला. महायुतीचे नेते पालकंमत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील आ. राजेश क्षीरसागर यांनी या कर्तव्यनाम्याबद्दल सांगताना काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं' म्हणत आम्ही स्वप्न दाखवत नाही तर मंजूर प्रकल्प घेऊन आलो असल्याचे स्पष्ट करीत

सतेज पाटील यांना टोला लगावला.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले

काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं या टॅगलाईनखाली प्रचार मोहीम आखत जाहीरनामा मांडला. यानंतर आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडूनही ‘जे मनात तेच मनपात’ या टॅगलाईनखाली कर्तव्यनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कर्तव्यनामाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांसमोर राज्य व केंद्र सरकारच्या ताकदीवर आधारित निधी, योजना आणि ठोस प्रकल्पांचा आराखडा मांडण्यात आला आहे. घोषणाबाजी नाही, मंजूर कामांसह आम्ही जनतेसमोर आलो आहोत”

धनंजय महाडिक यांनी सांगितले की, “आम्ही निवडणुकीत फक्त स्वप्न दाखवायला नाही तर मंजूर प्रकल्प घेऊन उतरलो आहोत.” अंबाबाई मंदिराचा विकास, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, महापूर नियंत्रण, उड्डाण पूल, बास्केट ब्रिज, आयटी पार्क यासारखी महत्त्वाची कामे आधीच मंजूर असून त्यावर काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला असून हे रस्ते पुढील २५ वर्षे टिकतील, असेही महाडिक म्हणाले. “इव्हेंट करून जनतेची दिशाभूल केली जाते, पण आता कोल्हापूरकर फसणार नाहीत,” असा टोला लगावत महाडिक म्हणाले की, राहुल गांधी यांच्या स्टाईलने प्रेझेन्टेशन दिले, पण गंगा म्हणून नाल्यात पडलेल्या राहुल गांधी यांच्यासारखी अवस्था त्यांची झाली आहे. 15 वर्षे यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी या गोष्टी का केल्या नाहीत? सतेज पाटील यांनी केएमटीमधून प्रवास करून दाखवला, पण याआधी कधी त्यांनी बसमधून प्रवास केला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “केंद्र आणि राज्यात आमचेच सरकार आहे. जिल्ह्यात दहा आमदार आमचे आहेत. मग विरोधक निधी कुठून आणणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधक फक्त जाहीरनाम्यांतून आमिषे दाखवत असल्याचा आरोप करत, “तुमच्याकडून विकास होणार नाही, उलट तुम्ही आम्हालाच पाठिंबा द्या,” असा टोला त्यांनी लगावला. मुश्रीफ यांनी थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटीही मान्य केल्या. योजनेचा भौगोलिक आणि हवामान अभ्यास न केल्यामुळे अडचणी आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, सुधारणांची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीच्या कर्तव्यनामावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “वचननामा पूर्ण करायचा असेल तर नेत्यांवर विश्वास हवा, आणि तो विश्वास महायुतीच्या नेतृत्वावर आहे,” असे ते म्हणाले. पारदर्शी प्रशासन, अधिकाऱ्यांची वेळोवेळी बदली, आणि नव्या प्रयोगांना संधी देणारी यंत्रणा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निधीतून विकासकामांना कोणतीही अडचण येणार नाही,” असे आबिटकर यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने योजना, आयटी पार्कसाठी निश्चित जागा, क्रिकेट स्टेडियम, तसेच अंबाबाई आणि जोतिबा देवस्थानासाठी 1400 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “महायुतीकडे महापालिकेची सत्ता आली तर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande