
नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांपासून श्रद्धेय असलेली सुफी संत परंपरा महाराष्ट्राच्या समन्वयवादी आणि समतावादी संस्कृतीची साक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही देताना दिसते. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी सुफी संतांचे दर्गे आणि त्यांचे उरूस, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. या ऊरूसाची सुरुवात झाली. आठवडा भर यात्रा सुरू राहते पंचक्रोशीतूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मनोभावे या ऊरूसात भक्ती भावाने सामील होतात.
नांदेड जिल्ह्यातील पेनूर या गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेला सय्यद बाबांचा दर्गा आहे. बाबा हे सुफी अवलीया संत होते. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून सय्यदबाबांचे भक्त पौष महिन्यात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात सामील होण्यासाठी येत असतात. सय्यद बाबांचे सर्व उत्सव आणि शूजाविधी हे हिंदू बांधव साजरे करतात. हा ऊरुस हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. या दर्यात श्रावणात नवनाथ पोथींचे श्रवण-वाचन होते. बेलफूलाने पूजन होते. ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या भावविश्वात सय्यद बाबांचे अढळ स्थान आहे.
पौष महिन्यात साजऱ्या होणाऱ्या उरूसाची वाट अबालवृद्ध आतुरतेने पाहात असतात. या यात्रेचे मानकरी रामदास पाटील गवते हे आहेत. त्यांच्या वडिलांपासून ही यात्रा मोठया प्रमाणात साजरी केली जाते. संदल मिरवणूक, लावण्यांचे कार्यक्रम, विविध क्रीडास्पर्धा याबरोबरच शेवटच्या दिवशी कुस्त्यांची भव्य दंगलही होते. ही यात्रा बच्चे कंपनीसाठी मेजवानी असते.हिंदूबहूल असलेल्या पेनूरमधील सय्यद बाबांचा उरूस समता, समन्वयाचे प्रतीक असल्याचे अनेक गावकरी सांगतात. अशा या यात्रेत सामील होण्याचे आवाहन यात्रेचे आयोजक आणि मानकरी माजी पंचायत समिती सदस्य रामदास गवते, प्राचार्य डॉ. अशोक पाटील गवते, अॅड. उत्कर्ष पाटील गवते, हर्षद पाटील गवते, नितीन पाटील गवते यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis