
ठाणे, 09 जानेवारी (हिं.स.)। लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक मतधिकार ॲपचा व्यापक प्रसार आज नौपाडा प्रभागसमितीत करण्यात आला.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकाराने नौपाडा प्रभाग समितीने जोरदार आणि प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
निवडणूक प्रक्रियेविषयी अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी हे ऍप विकसित करण्यात आले आहे. मतदार यादी तपासणी, मतदान केंद्राची माहिती, मतदानाची तारीख व वेळ, उमेदवारांची माहिती तसेच निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या सूचना या सर्व बाबी या ऍपद्वारे सहज उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, प्रथमच मतदान करणारे युवक-युवती तसेच कामानिमित्त व्यस्त असणाऱ्या नागरिकांसाठी हे ऍप अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
नौपाडा प्रभाग समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत घराघरांत जाऊन मार्गदर्शन, चौक-चौकांत माहिती फलक, बॅनर, पोस्टर्स, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे ऍप डाउनलोड व वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. खारकर आळी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि विकास प्लम या परिसरात गाडी फिरून भोंग्या द्वारे मोठ्या आवाजात मतधिकार ॲपचा प्रसार करत होती.शिक्षिका चंद्रिका पालन स्वीप टीमला सोबत एकत्रितपणे नागरिकांशी संवाद साधत असून, “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहेत.
स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून,अनेकांनी ऍपमुळे मतदानासंदर्भातील संभ्रम दूर झाल्याची भावना व्यक्त केली आहे. “पूर्वी माहिती मिळवण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी करावी लागत होती, आता सर्व माहिती मोबाईलवर मिळते,” असे नागरिकांनी सांगितले.
डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने ठाणे महानगरपालिकेचे हे पाऊल निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे.नौपाडा प्रभाग समितीच्या पुढाकारामुळे मतधिकार ॲप केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता, लोकशाहीचा विश्वासार्ह दुवा बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविली जाणार असून, मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर