
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.)। माजी खासदार नवनीत राणा या हिंदुत्वात सरळ सरळ फूट पाडत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांना खोडके यांचा बदला घ्यावयाचा आहे, यासाठी त्यांनी माझ्यासारख्या भाजपच्या निष्ठावान आहे. त्यांच्या भूमिकेने आमचा कार्यकर्त्याचा जाहीर अपमान केलेला अपेक्षा भंग झालेला आहे. असे भाजप उमेदवार राजेश साहू पड्डा यांनी म्हटले आहे.राजेश साहू पड्डा हे अमरावती महापालिकेच्या विलासनगर- मोरबाग गवळीपूरा प्रभागातील (क्र. ६) भाजपचे ड गटातील अधिकृत उमेदवार आहेत. बुधवारी (ता. सात) भाजपाच्या वरिष्ठ नेत्या, माजी खासदार नवनीत राणा या प्रभागात भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या होत्या. त्या व्यासपीठावरून नवनीत राणा यांनी मांडलेली भूमिका त्यांच्याच पक्षाचे उमेदवार राजेश साहू पड्डा यांच्या विरोधात होती. त्यावर राजेश साहू पड्डा यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.आपण युवावस्थेपासून भाजपाचे काम करतो व नवनीत राणा यांचा नितांत आदर करतो.त्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार होत्या, तेव्हा त्यांच्यासाठी जीवाचे रान केले. रात्रीचा दिवस करून त्यांचा प्रचार केला. मोरबाग प्रभागात त्यांना भरघोस मतदान झाले. नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार असल्याने आपण घराघरात जाऊन लोकांना भेटलो. त्यांचा पराभव झाला तेव्हाही त्यांच्या भेटीला गेलो असता माझ्या डोळ्यात अश्रू होते. मोरबाग प्रभागात हिंदुत्वाला मानणारे आणि जपणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत. नवनीत राणा हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या असल्याने आपण पण प्रचंड उत्साहित होतो. पण नवनीत राणा यांनी उघडपणे माझ्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर फोडण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे माझा समाज देखील नाराज झाला आहे. मी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो, त्या समाजावर देखील हे दूषण लावले गेले आहे, असे राजेश साहू पड्डा यांनी म्हटले आहे.नवनीत राणा यांची भूमिका प्रभागातील हिंदुत्ववादी लोकांना अचंबित करणारी आहे. हिंदू पुरस्कर्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवनीत राणा हिंदुत्वात सरळ सरळ फूट पाडत आहेत, असा थेट आरोप राजेश साहू यांनी केला. मोरबाग प्रभागाला आणि माझ्या संमाजाला हिंदुत्व म्हणजे मोदीजी आणि मोदीजी म्हणजे कमळ हेच समीकरण पक्के ठाऊक आहे. नवनीत राणा यांच्या या फूट पाडण्याच्या भूमिकेने त्यांनी आमचा अपेक्षा भंग केला आहे, असेही राजेश साहू पड्डा यांनी म्हटले आहे.नवनीत राणा माझ्या विरोधात जाण्यासाठी काय कारण असू शकते ? विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुलभा संजय खोडके यांना पाठींबा होता. आपण भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने पक्षादेश मानून सुलभा संजय खोडके यांचे काम केले. तेव्हा आपण खोडकेंचे काम करू नये, असा दबाव माझ्यावर होता. कारण नवनीतजींना खोडकेंना हरवायचे होते. त्याचा बदला घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ, स्टार प्रचारक नवनीत यांनी बुधवारी माझा जाहीर अपमान केला. पक्षविरोधी भूमिका जाहीरपणे घेतली. आमचा प्रभागातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. ते प्रभागात चारही जागेवर कमळाला विजयी करतील, असा विश्वास व्यक्त करीत नवनीत राणा यांनी पक्षात व हिंदुत्वात फूट पाडण्याचे कार्य करू नये, असेही आवाहन राजेश साहू पड्डा यांनी केलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी