पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा
नवी मुंबई, 09 जानेवारी, (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध्‍ करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून
तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा


नवी मुंबई, 09 जानेवारी, (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध्‍ करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून नावाजले जात आहे. स्मारकाला दररोज मोठया संख्येने नागरिक व पर्यटक भेट देत असतात.

तामिळनाडू येथील पेरियार मणियम्मई विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाला भेट देत येथील वैविध्यपूर्ण दालनांचे, त्याच्या मांडणीचे व त्यामध्ये जपलेल्या कलात्मकतेचे मनापासून कौतुक केले. स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अभ्यासकांसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना असून येथील दुर्मीळ छायाचित्र संग्रहालयातील बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहून भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महत्वाचे म्हणजे हे स्मारक अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले, सुव्यवस्थित आकर्षक मांडणी असलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी असल्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, घटनात्मक दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाचे काम करते तसेच वर्तमानातील व भावी पिढ्यांना संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना दिसते.

या भेटीदरम्यान कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाविषयीच्या भावना आणि सदिच्छा अंत:करणापासून असल्याचे सांगत यामधून आयुक्तांची दूरदृष्टी आणि समतेची मूल्ये जपण्याची वचनबद्धता दिसून येते असे मत व्यक्त केले. त्यांनी स्मारकासोबत संयुक्त उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि विद्यापीठीय सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande