
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर एकूण ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये खुला प्रवर्ग २ शेतकरी, महिला १ शेतकरी, अनुसूचित जाती / जमाती २ शेतकरी अशा प्रकारे एकूण पाच शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची निवड ही त्यांनी अवलंबलेल्या विविध पीक पद्धती, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान व उत्पादनक्षमतेच्या आधारे करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारापेक्षा वरिष्ठ असलेले राज्यस्तरीय पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत, असे शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. तरी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी १६ जानेवारीपर्यंत आपले अर्ज प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना या कार्यालयात उपलब्ध आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा दौलत चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis