कागदांपलीकडची माणुसकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेकडो कुटुंबांना दिलासा
रायगड, 9 जानेवारी, (हिं.स.)। गरिबी, आजार आणि उपचारांचा वाढता खर्च यामध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक कुटुंबांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष हा जणू आशेचा किरण ठरला आहे. १ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या
कागदांपलीकडची माणुसकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेकडो कुटुंबांना दिलासा


रायगड, 9 जानेवारी, (हिं.स.)। गरिबी, आजार आणि उपचारांचा वाढता खर्च यामध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक कुटुंबांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष हा जणू आशेचा किरण ठरला आहे. १ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या अवघ्या आठ महिन्यांत या कक्षाच्या माध्यमातून ४७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट गरजू रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. ही मदत म्हणजे केवळ आकड्यांची नोंद नसून, अनेक घरांमध्ये परतलेला श्वास आणि पुन्हा उजळलेली आशा आहे.

या कालावधीत प्राप्त झालेल्या १०६ अर्जांपैकी ६० रुग्णांना प्रत्यक्ष अर्थसहाय्य मिळाले. हृदय प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कोकलीअर इम्प्लांट यांसारख्या अत्यंत खर्चिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये ही मदत जीवनदायी ठरली. विशेषतः लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व नवजात शिशूंच्या आजारांवर उपचार घेणाऱ्या १३ कुटुंबांसाठी हा आधार अमूल्य ठरला. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजनेमुळेही अनेकांना वेळेत उपचार मिळू शकले.

प्रशासनाने केवळ कागदोपत्री मदतीपुरते न थांबता प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ‘नमो नेत्र संजीवनी अभियान’अंतर्गत १९९ शिबिरांतून हजारो नागरिकांची नेत्रतपासणी झाली, तर ‘श्री गणेश आरोग्याचा अभियान’मुळे दुर्गम भागातील लोकांनाही आरोग्यसेवा मिळाली. रक्तदान शिबिरांतून संकलित रक्ताने अनेक अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांचे प्राण वाचले.

पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेली मदत, जनजागृती उपक्रम आणि रुग्णालयांशी समन्वय या सगळ्या प्रयत्नांमधून प्रशासनाची सामाजिक बांधिलकी दिसून येते. रायगडमधील गरजूंसाठी हा मदत कक्ष आज खऱ्या अर्थाने माणुसकीचा हात ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande