
ठाणे, 09 जानेवारी (हिं.स.) राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
येत्या 15 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेचे मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या दोन्ही दिवशी निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेतील 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रे असून या ठिकाणी राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण 11500 कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले हे सर्व कर्मचारी असून त्यांची नावे मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल आदी ठिकाणच्या मतदार यादीत नोंदलेली आहेत.
निवडणूक कर्तव्यामुळे हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने टपाली मतदानाची व्यवस्था केली असून, या सुविधेचा कर्मचारी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतपत्रिकांचा स्वीकार केला आहे.
कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील टपाली मतपत्रिका भरुन त्या ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहणार असल्याचे टपाली मतदानाचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त दिनेश तायडे यांनी सांगितले.
राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे मतदान इतर महानगरपालिका क्षेत्रात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचेही तायडे यांनी नमूद केले.
अद्यापपर्यंत ज्यांनी टपाली मतपत्रिका घेतलेल्या नाहीत, त्यांनी त्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या सुविधेमुळे निवडणूक ड्युटीवर असलेले अधिकारी व कर्मचारी टपाली मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर