
पुणे, 09 जानेवारी (हिं.स.)।
पाच वर्षांची मुदतवाढ घेतल्यांनंतर दशकांनंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत असून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, परिषदेची कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याचे सांगत परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी धर्मादाय आयुक्तांनी प्रशासक नियुक्त करावा आणि प्रशासकाच्या नियंत्रणाखाली निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी राजकुमार धुरगुडे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेसह राज्य धर्मादाय आयुक्त, मुंबई, धर्मादाय उपायुक्त आणि सह धर्मादाय आयुक्त पुणे विभाग यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.साहित्य परिषदेची कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने सह धर्मादाय आयुक्तांकडे पूर्वीच याचिका दाखल केली आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांनी निश्चित मुदतीत निर्णय द्यावा अन्यथा प्रशासकाची नियुक्ती करून त्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक घ्यावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु