
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचे रण आता पेटू लागले आहे. प्रचार फेऱ्यांपाठोपाठ जाहीर सभांचा धडाका सुरु झाल्यामुळे मतदारांमध्ये देखील निवडणूक आणि उमेदवारांबद्दल चर्चा सुरु झाली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या फाटाफुटीमुळे कोणता उमेदवार कुठे याचा अंदाज मतदारांना लागत नव्हता. जाहीर सभा आणि प्रचार फेऱ्यांमुळे उमेदवार आणि त्यांचा पक्ष या बद्दल मतदार माहिती घेऊ लागले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत प्रमुख राजकीय पक्षांमध्ये युती - आघाडीचा घोळसुरुच होता. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार संभ्रमातच होते. अखेरच्या क्षणी शिवसेना भाजपची युती तुटल्यामुळे या दोन्हीही पक्षांना त्यांनी ठरवलेल्या प्रभागांमध्ये उमेदवार उतरवावे लागले. दुसरीकडे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रस यांची आघाडी देखील बिघडली. दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
वंचित बहुजन आघाडीने देखील आपले उमेदवार उभे केले तर एमआयएमने जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी देत उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी या घडामोडी घडल्यामुळे कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार या बद्दल मतदारांमध्ये संभ्रम होता. प्रचारफेऱ्यांच्या पाठोपाठ आता विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा सुरू झाल्या आहेत. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही जाहीर सभा होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis