
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)।
विद्यार्थ्यांनी आयुष्यात ताणतणाव न घेता आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आत्मविश्वासाने व सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जावे. हसतमुख राहणे हेच यशस्वी व आनंदी जीवनाचे खरे सूत्र असून माणसाच्या चेहर्यावरील हास्य हाच त्याचा सर्वात मोठा दागिना आहे, असे प्रतिपादन त्र्यंबक वडसकर यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने गंगाखेड रस्त्यावरील ममता विद्यालयात आयोजित शालेय व्याख्यानमालेच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मुंजाजी चोरघडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चतुरंग प्रतिष्ठानचे विलास चट्टे व शिवाजी सूर्यवंशी उपस्थित होते. पुढे बोलताना वडसकर म्हणाले की, मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर जीवन चालते; मात्र जीवनाला कलेची जोड मिळाल्यास ते अधिक सुंदर व समृद्ध होते. कला आत्मसात केल्याने व्यक्तिमत्त्व विकास घडतो आणि आनंदाने जगण्याची दृष्टी मिळते. नाटक ही कला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत पूरक असून त्यातून आत्मविश्वास, स्मरणशक्ती, एकाग्रता व निर्भीडपणा यांसारखे गुण संस्कारक्षम वयात विकसित होतात. दरम्यान, चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षांपासून शालेय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असून विविध शाळांमध्ये जाऊन नामवंत वक्ते वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही प्रेरणादायी व उपयुक्त ठरत असल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis