
सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। अतिवृष्टी व महापुराचा फटका सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याची बाजारातील स्थिती आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २९ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत तब्बल पाच हजार ट्रक कांदा विक्रीसाठी आला. आवक वाढल्याने ३२०० रुपयांपर्यंत गेलेला उच्चांकी भाव आता २३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक २ आणि ३ जानेवारीला आली होती. २ जानेवारीला ६७६ तर ३ जानेवारीला सोलापूर बाजार समितीत ७६२ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. २९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना किमान भाव प्रतिक्विंटल १३०० आणि उच्चांकी भाव ३२०० रुपये मिळाला होता. पण, आता तो भाव एक हजार ते २३०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. दरम्यान, कांद्याची रिकामी पिशवी तथा बारदाना ३० ते ४० रुपयाला मिळत असून कांदा चिरायला प्रतिपिशवी १५० रुपये आणि गाडीभाडे ३० रुपये पिशवी द्यावे लागत आहे.कांदा काढणीसाठी ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. कांदा लागवडीसाठी जमिनीची मशागत, बियाणे, लागवड, खते आणि खुरपणीसाठी देखील मोठा खर्च आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्विंटल किमान दोन हजार रुपयांचा भाव अपेक्षित आहे. पण, तेवढा भाव मिळत नाही. दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना लगेचच रोख पैसे मिळत नाहीत. १५ दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो. त्यामुळे सध्या बळिराजाच्या डोळ्यात सध्या अश्रू पाहायला मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड